Budget session Day 3 : संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमककपणे लावून धरली.
उत्तर प्रदेशचे योगी सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे आणि सरकारने मृतांची संपूर्ण यादी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. जनतेने तुम्हाला येथे टेबल फोडण्यासाठी पाठवलेले नाही. सभापती ओम बिर्ला यांनी एनके प्रेमचंद्रन आणि कीर्ती आझाद यांची नावे घेत म्हटले की, तुम्ही मला सांगता की तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या जागेवर बसत नाही.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान असे वागू नका, असे आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना केले. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले, मला १० प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण विरोधी पक्ष मला ते करू देत नाहीयेत. मला गांधी कुटुंब आणि जॉर्ज सोरोसचे संबंध उजेडात आणायचे आहेत. जॉर्ज सोरोस यांच्या मुलाचा बांगलादेशचे सीईओ मोहम्मद युनूस यांच्यासोबतचा फोटो प्रकाशित झाला आहे आणि त्यांचा मुलगा बांगलादेशात ४ दिवस राहिला.
दुबे यांनी बांगलादेशाला भारतात घुसखोर पाठवण्याचे आणि भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे केंद्र असे म्हटले आहे. त्या देशाचा पर्दाफाश करणार असल्याचा दावाही दुबे यांनी केला. दरम्यान, तामिळनाडूमध्ये मनरेगा अंतर्गत १,०५६ कोटी रुपयांचे प्रलंबित वेतन न मिळाल्याबद्दल चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. मी सरकारला थकबाकीची रक्कम त्वरित भरून काढण्यासाठी आणि तामिळनाडूसाठी सुधारित कामगार बजेट मंजूर करण्यासाठी विनंती करतो, असे त्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
३० मृतांची यादी का जाहीर केली नाही
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, आम्ही एक तासासाठी सभागृहाबाहेर पडलो. आम्ही पुन्हा येऊन हा मुद्दा उपस्थित करू. आम्हाला फोन येत आहेत, लोक रडत आहेत, ते त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकत नाहीत. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की असे का झाले. ३० मृतांची यादी जाहीर केलेली नाही. आमच्या सूचना सतत नाकारल्या जात आहेत आणि याचे कारण माहित नाही.





