Raju Shetty : आंदोलनाचा तिसरा दिवस; राजू शेट्टींनी सरकारला इशारा देत केली मोठी घोषणा म्हणाले…
Raju Shetty : या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

Raju Shetty : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज (५ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
नागठाणे परिसरात सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. साताऱ्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने सांगलीमार्गे वळवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त अंतर आणि प्रवासाच्या वेळेचा सामना करावा लागत आहे.
राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांना इशारा दिला आहे.
“कष्टाचा ऊस दारात उभा आहे, सण तोंडावर आहे. जर सरकार आणि साखर कारखानदार यांच्या आडमुठेपणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी रस्त्यावर साजरी करावी लागत असेल, तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि शेतकरी साखर कारखान्यांचे चेअरमन आणि संचालकांच्या दारात शिमगा आंदोलन करतील,” असा इशारा त्यांनी दिला.
४५०० वरून ४२०० रुपयांवर नवी मागणी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४,५०० रुपये मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सुरुवातीपासून मागणी आहे. मात्र, साखर कारखानदार ३,८०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यास तयार नसल्याने चर्चेतून तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि चर्चेची दारे खुली राहावीत, यासाठी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संमतीने पहिल्या उचलीची मागणी ४,२०० रुपये करण्याची घोषणा केली आहे.
“आम्ही चर्चेची दारे खुली ठेवत ४२०० रुपये पहिली उचल देण्याची नवीन मागणी जाहीर करत आहोत.” असे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीवरही तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था
या आंदोलनात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी सहभागी शेतकऱ्यांसाठी हजारो भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता केवळ संघटनेपुरते मर्यादित न राहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेला व्यापक लढा बनले आहे.
आता राजू शेट्टी यांनी ४,२०० रुपयांची नवी मागणी जाहीर केल्यानंतर सरकार आणि साखर कारखानदार काय भूमिका घेतात, तसेच महामार्गावरील आंदोलनावर तोडगा कधी निघतो, याकडे शेतकरी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.





