पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेचा तिसरा दिवस ‘निर्विघ्न’

किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता अंतिम वर्ष परीक्षा सुरळीत
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात झाली आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशी किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा सुरळीत झाल्या. परीक्षांमध्ये काहीच अडचणी येवू नयेत याची बारकाईने दक्षता घेण्याकडे विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले आहे.
अंतिम वर्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल केला. त्यानंतर पहिल्याच दिवशी ऑफलाइन परीक्षेत गोंधळ उडाला. त्यानंतर मंगळवारी (दि.13) ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे दुपारच्या परीक्षांचे पेपर रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
नियोजन कोलमडल्याने विद्यार्थी, पालक, संघटना यांच्याकडून टीका होत आहे. तांत्रिक चुका सुधारत बुधवारी (दि.14) परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. यातही काही अडचणी आल्या होत्या. मात्र, पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी फारशा तक्रारी नव्हत्या.
काही विद्यार्थ्यांचे लॉगिन लवकर झालेच नाहीत. एमए मराठी भाग दोन (एक्सर्टनल) पेपर दुपारी एकऐवजी चारच्या सुमारास सुरू झाला. बीए इंग्रजीचा (अनिवार्य) पेपर पूर्ण सोडवला तरी तो सबमीट होत नव्हता. एमए अर्थशास्त्राचा पेपर दिसण्यास अडचणी आल्या. अनेक विद्यार्थ्यांचा पूर्ण पेपर सोडवून झाल्यानंतर तो सबमीट झाला नाही, पुन्हा पेपर सोडवावा लागला. विधीच्या पेपरलाही तांत्रिक अडचणी आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी सर्व ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा वेळेत व विना व्यत्यय सुरळीत सुरु झाल्या. दिवसभरात ऑनलाइन परीक्षेसाठी एकूण 58 हजार 827 विद्यार्थी, तर ऑफलाइनसाठी 19 हजार 724 विद्यार्थी अपेक्षित होते. यात 50 हजार 791 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर 17 हजार 432 जणांनी ऑफलाइन परीक्षा दिली. सकाळच्या सत्रात 36 हजार 302 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर या सर्वांनी प्रामुख्याने आता परीक्षांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. बैठकांचा धडाका लावला आहे. हेल्पलाईवरील तक्रारी सोडविण्यासाठी मनुष्यबळही वाढवले आहे.
विद्यार्थ्यांना समस्या नोंदणी अर्ज भरता येणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व बॅकलॉग परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत काही अडचणी आल्यास त्याबद्दल समस्या नोंदणी अर्ज भरमन माहिती नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. यात नाव, पीआरएन नंबर, परीक्षा पद्धत, विषय, परीक्षा पेपरची तारीख, मोबाइल नंबर, परीक्षेबाबतची अडचण आदी माहिती नोंदविणे आवश्यक आहे.





