जन्मानंतर सहा वर्षांनी झाली बाप-लेकीची हृद्य भेट ! मुलीच्या भवितव्याचा विचार करून विभक्त राहणारे पती-पत्नी आले एकत्र

पुणे -चिमुकलीचा विचार करून तिच्या जन्मापूर्वीपासून वेगळे राहणाऱ्या अभियंता पती-पत्नीने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी एकामेकाविरोधातील दावे काढून घेतले आहेत. पहिल्यांदाच भेटल्यानंतर मुलगी त्याला “पप्पा’ म्हणाली. अन त्याचे डोळे आनंदाने भरून आले.
रितेश (वय 36) आणि सायली (वय 32) (नावे बदलली आहेत) हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. तो तामिळनाडू येथील, तर ती पुण्यात राहते. 2015 मध्ये विवाह झाल्यानंतर पुढे त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले. त्यानंतर तो तामिळनाडू येथे निघून गेला. तर, ती गर्भवती असताना माहेरी गेली. 2016 पासून ते विभक्त राहू लागले. तिला 2017 मध्ये मुलगी झाली. त्याने तामिळनाडू येथे घटस्फोटाचा दावा दाखल केला. तिने नांदायला तयार असल्याची केस पुणे येथील न्यायालयात केली. तिला आणि जन्मलेल्या मुलीला पोटगी मागितली.
तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागून तामीळनाडू येथील केस पुण्यात ट्रान्सफर करून घेतली. तो हजर झाला. त्याचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. घटस्फोटासाठी तिला चेन्नई येथे फ्लॅट आणि दागिने मिळून 1 कोटी रुपयांची संपत्ती देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ती नांदण्यावरच ठाम होती. दोघांना त्यांच्या वकिलांनी समजावून सांगितले. ते दोघे एकत्र राहण्यास तयार झाले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला. त्यानंतर एकमेकांच्या विरोधातील केसेस काढून टाकल्या. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.बी.येरलेकर यांच्या न्यायालयात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
समुपदेशन हे मानवासाठी वरदान आहे. समुपदेशनामुळे सात वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी एकत्र आले आहेत. दोघांनी नव्या जोमाने पुन्हा संसार सुरू केला आहे. मुलीचे भविष्यही सुखकर बनणार आहे. समुपदेशनामुळे वेळ, पैशाची बचत होते. त्याबरोबरच होणाऱ्या त्रासातून सुटका होते. दोन्ही बाजूचे पक्षकार आनंदी असतात.
ऍड. राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वकील





