Sunetra Pawar : वेळ येईल तशा गोष्टी समजतील- सुनेत्रा पवार
Sunetra Pawar ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ११) बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

बारामती : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत ‘वेळ येईल तशा सर्व गोष्टी समजतील,’ असे सूचक विधान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळत त्यांनी एका वाक्यात विषयाला पूर्णविराम दिला असला, तरी त्यांच्या या विधानामुळे राजकीय घडामोडींबाबतचा सस्पेन्स मात्र कायम राहिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ११) बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘वेळ येईल तशा गोष्टी समजतील,’ असे उत्तर दिले. त्यांच्या या मोजक्या प्रतिक्रियेमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
दरम्यान, विलीनीकरणाचा निर्णय झाल्यास त्याचे स्वरूप काय असेल, कोणता गट कोणामध्ये विलीन होणार, नव्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असेल, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याबाबत भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.
आमदार रोहित पवार यांनी भाजपची साथ सोडल्यास विलीनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अशी भूमिका मांडल्याने या विषयातील राजकीय पेच अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘दादा असते तर विलीनीकरण झाले असते,’ असे विधान केल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या एका वाक्यातील प्रतिक्रियेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या दिशेने पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का, की हा केवळ राजकीय चर्चांचा भाग आहे, याचे उत्तर आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.





