Wai Crime : वाईच्या एमआयडीसीतील एटीएम मशीन फोडून 17 लाखांची रक्कम लंपास

वाई : वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एटीएममशीनची कटरच्या साह्याने तोडफोड करून चोरट्यांनी त्यातील 17 लाखांची रोकड लंपास केली. संशयितांचा शोध घेण्यासाठी वाई पोलीसांची डीबी टीम आणी सातारा येथील एलसीबीची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
सविस्तर वृत्त असे की वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एक एटीएम आहे. त्या एटीएमचा लाभ एमआयडीसीमधील हजारो कामगारांना होत होता. हे एटीएम मशीन सकाळी सात वाजता उघडायचे आणि रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते. याच एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्यांच्या टोळीची करडी नजर होती.
दि. ८ च्या मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने कटरच्या साह्याने त्याची तोडफोड करून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती वाई पोलिसांना सकाळी मिळताच वाई पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.या गंभीर घटनेची माहिती एकत्रित करून ती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक देवकर यांना घटनास्थळी पाठवले.
यावेळी वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम, परिविक्षाधीन उपअधीक्षक शाम पानेगावकर, वाईचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, वाई डीबीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांची टीम उपस्थित होती. या सर्व पोलिस यंत्रणेला अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. या गंभीर घटनेचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सुधीर वाळुंज तपास करत आहेत.





