Badlapur News : रंग धुवायला नदीत उतरले अन् जीवानिशी गेले; ‘त्या’ चौघांसोबत नेमकं काय घडलं?

बदलापूर : आज संपूर्ण देशभरात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. एकीकडे आनंदाचे वातावरण असताना बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
चामटोली गावाजवळील पोद्दार गृह संकुलातील काही मुलांचा ग्रुप धुळवड संपल्यानंतर रंग धुण्यासाठी उल्हास नदीवर गेला होता. यावेळी त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले आर्यन मेदर (15 वर्षे),आर्यन सिंग (16 वर्षे) ,सिद्धार्थ सिंग (16 वर्षे) ,ओम तोमर (15 वर्षे) या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे हे चारहीजण दहावीचे विद्यार्थी होते. 17 तारखेला दहावीचा शेवटचा पेपर आहे. मधल्या दिवसात सुट्टी असल्याने त्यांनी धुळवड सण साजरा केला. आणि हाच सण त्यांचा अखेरचा ठरला. या घटनेने पोद्दार गृह संकुलावर शोककळा पसरली आहे. दोन ते अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.





