काबुल : अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष आणि स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करणारे अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबान्यांनी हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे, मात्र पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
तालिबानने रोहुल्लाह सालेह याची ओळख पटल्यानंतर त्याचा छळ करुन नंतर फासावर लटकवल्याची माहिती आहे. रोहुल्लाह सालेहचा भाचा इबदुल्लाहने तालिबान यावेळी वारंवार मृतदेह सडला पाहिजे म्हणत होते असे सांगितले आहे. “त्यांनी गुरुवारी हत्या केली असून आम्हाला दफन करण्यासाठीही मृतदेह देत नाहीयेत. ते वारंवार मृतदेह सडला पाहिजे असे म्हणत आहेत,” असे इबदुल्लाहने सांगितले असल्याचे एका इंग्रजी संकेतस्थळाने सांगितले आहे.
तालिबानने पंजशीरचा पूर्ण ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रतिकार गटाने हा दावा फेटाळून लावला आहे. काही रिपोर्टनुसार, पंजशीरमध्ये प्रतिकार गटाचं नेतृत्व करणारा अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह तालिबानने पंजशीरचा ताबा मिळवल्यानंतर देश सोडून ताजिकिस्तानला पळून गेल्याचा दावा आहे. मात्र ताजिकिस्तानमधीस अफगाणिस्तान सरकारचे राजदूतांनी हा दावा फेटाळला आहे.
तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील सत्ता मिळवली असून पंजशीर खोऱ्याचाही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रतिकार गटाने हा दावा फेटाळून लावला आहे.