श्रीगोंदा (समीरण नागवडे) – ‘त्याच्या’ जन्मापासून कुटुंबाची भरभराट झाल्याने त्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच त्यांनी बैलाचा अंत्यविधी आणि दशक्रियाविधी पौराणिक पद्धतीने करीत त्याला साश्रुनायनांनी अखेरचा निरोप दिला. ही दुर्मिळ घटना तालुक्यातील भावडी येथे अनुभवायला मिळाली. नवनाथ भोसले हे शेतकरी असून ते कुटुंबियांसह तालुक्यातील भावडी येथे राहतात. १९९८ साली त्यांच्या गावरान गाईला वासरू झाले. त्यांनी त्याचे नाव देवमन ठेवले. ‘देवमन’च्या जन्मापासून कुटुंबियांची भरभराट झाल्याने भोसले कुटुंबीय मानतात. ‘देवमन’ शेतीकामाजोगा झाल्यानंतर भोसले कुटुंबीयांनी आणखी बैल घेतला. दोन बैलांच्या साहाय्याने नेटाने शेती करीत भोसले कुटुंबियांनी मुलाला शिक्षण देत अधिकारी बनवले. आपले मालक घरी आल्याशिवाय ‘देवमन’ खाली बसत नसे. ‘देवमन’ म्हातारा झाल्यानंतर भोसले कुटुंबियांनी त्याला एका सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतली. गेली चार वर्षे ‘देवमन’ एखाद्या ‘रिटायर्ड’ व्यक्तीप्रमाणे चांगले जीवन जगला. ०२ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने ‘देवमन’चे निधन झाले. भोसले कुटुंबियांनी आपल्या भावडी येथील निवासस्थानी ‘देवमन’वर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार केले. आज(दि.११) ‘देवमन’चा दशक्रियाविधी पौराणिक पध्दतीने करण्यात आला. भोसले कुटुंबियांनी ‘देवमन’च्या दशक्रियाविधीसाठी आप्तेष्ट-नातेवाईकांनाही बोलविले होते. एवढेच नव्हे तर प्रवचन देखील ठेवले होते. तब्बल २४ वर्षे साथ दिलेल्या ‘देवमन’चा अंत्यविधी, दशक्रियाविधी पार पाडताना भोसले कुटुंबियांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. एकीकडे मानवता संपत चालल्याच्या चर्चा झडत असतात. माणसं माणसांच्याही कामी पडत नसल्याची कित्येक उदाहरणे पहायला मिळतात, अशा वातावरणात भोसले कुटुंबियांनी आपल्या बैलाप्रति जपलेले नातं आणि स्नेहभाव नक्कीच सगळ्यांना हेवा वाटावा असा आहे. ‘देवमन’च्या जन्मापासून आमची भरभराट झाली. तो आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होता. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. – नवनाथ भोसले, (शेतकरी)