“स्वतः नातं जपण्यात अपयशी म्हणून ‘ते’ सतत माझ्यावर टीका करतात”; भावना गवळींची उद्धव ठाकरेंवर टीका

यवतमाळ : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ‘उद्धव ठाकरे हे नातं जपण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून ते वारंवार पवित्र नात्यावर वक्तव्य करीत असतात. स्वतः अपयशी ठरल्यामुळे बहीण भावाच्या राखीसारख्या पवित्र सणाच्या अनुषंगाने ते नेहमी माझ्यावर टीका करीत असतात,’ असे म्हणत भावना गवळी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, गेल्या २४ वर्षांपासून आपण रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करीत आहोत. मी माझ्या मतदारसंघातील हजारो नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांना राखी पाठवत असते. याव्यतिरिक्त अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनासुद्धा राखी बांधत आली आहे. त्यामुळे कारवाई व रक्षाबंधन सणाचा काहीही संबंध नाही. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः नातं जपण्यात अपयशी ठरल्यामुळे दुसऱ्यावर टीका करीत असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतसुद्धा ते नातं टिकवू शकले नाही.
पक्षातील आम्ही तेरा खासदार व ४०-५० आमदार यांच्यासोबतही ते नातं जपू शकले नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१४मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थापन केले होते. मात्र, आज त्यांच्यावरही टीका करीत आहेत. जे एकनाथ शिंदे खांद्याला खांदा लावून उद्धवजींसोबत काम करीत होते, त्यांच्यावर टीका केली जात आहे. स्वतः नातं जपण्यात अपयशी ठरायचं आणि दुसऱ्यावर टीका करायची, हा मुळात त्यांच्यातील दोष असल्याचा आरोपही खासदार गवळी यांनी केला.
दरम्यान, खासदार भावना गवळी यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू होती. या दरम्यान मागील वर्षी खासदार गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. यानंतर भावना गवळी यांच्याविरोधात ईडीची कारवाई थांबली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता त्यांच्या याच टीकेला भावना गवळी यांनी उत्तर दिले आहे.





