प्रभात वृत्तसेवा शिरूर – पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून उभारली जाणारी शेततळी ग्रामीण भागातील लहान बालकांच्या जीवावर बेतत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. शिरूर तालुक्यासह राज्यातील अनेक भागांत उघडी व असुरक्षित शेततळी लहान मुलांच्या मृत्यूचे कारण ठरत असून, अशा घटनांमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये भीती चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेततळी उभारणीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, मात्र त्यासोबत सुरक्षा कुंपण, चेतावणी फलक अथवा संरक्षक उपायांची अट नसते. त्यामुळे ही तळी पाण्याने भरल्यावर त्यांच्या भोवती कोठेही प्रतिबंधात्मक व्यवस्था नसल्याने मुले सहजपणे पाण्यात जातात. शेततळी प्लास्टिक शीटवर उभारली जात असल्याने त्यात पाय घसरून अपघात होण्याचा धोका अधिक असतो. खोल पाण्यात पडल्यावर बाहेर पडणे कठीण होऊन मृत्यू ओढावतो.या तळ्यांची रचना, देखरेख किंवा सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय अशा कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात नाही. यामुळे शेतकरी व शासनाने शेततळी सुरक्षित करण्यासाठीता आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. खालील उपाययोजना करणे आवश्यक.. १. प्रत्येक शेततळीभोवती मजबूत कुंपण लावणे बंधनकारक करावे. २. ‘पाण्यात जाणे धोकादायक आहे’ असे स्पष्ट सूचना फलक लावावेत. ३. ग्रामसभा, शाळा व अंगणवाड्यांतून शेततळ्याचा धोका समजावून सांगणे. ४. अनुदानासोबत सुरक्षा नियमांची सक्ती करणे. ५. बचाव साधने – दोर, लाइफ जॅकेट्स, ट्यूब अशा वस्तू जवळ ठेवाव्यात. ६. तलाठी, ग्रामसेवक आदींच्या मार्फत तळ्याची नियमित तपासणी व्हावी.