Michael Jackson: मायकल जॅक्सनच्या ‘या’ सॉक्सचा लिलाव लाखों रुपयांवर; किंमत ऐकून व्हाल थक्क!

Michael Jackson: आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन जगभरात प्रसिद्ध आहे. त्याने गायलेली गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. मायकल जॅक्सन या जगात नसला तरी त्याने वापरलेल्या खूप वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. अश्यात तो चर्चेत आला आहे कारण त्याच्या एका वस्तूची किंमत लाखों रुपयांवर विकली गेली आहे. त्यामुळे मायकलची क्रेझ किती आहे हे यावरून दिसून येते. अलीकडेच त्याच्या एका सॉक्सचा लिलाव लाखों रुपयांवर झाला आहे .
मायकल जॅक्सन हा हॉलिवूडचा पॉप सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याच्या एका जुन्या सॉक्सचा फ्रान्समध्ये लिलाव करण्यात आला. या लिलावात तब्बल ८,८२२ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ७. ३५ लाख भारतीय रुपयांना विकला गेला आहे. विकले गेलेले हे सॉक्स १९९७ साली झालेल्या ‘HIStory World Tour’ दरम्यान फ्रान्सच्या निम्स शहरात मायकलने परफॉर्म करताना वापरले होते.
Michael Jackson’s old stained sock has sold for over $8,000 at an auction in France pic.twitter.com/bgNxhMZIN8
— Dexerto (@Dexerto) July 30, 2025
हे सॉक्स ऑफ व्हाईट रंगाचे असून जुन्या काळात वापरण्यात आल्याचे दिसून येते. त्यावर काही ठिकाणी डागही दिसून येत आहेत. हे सॉक्स एका स्टेज टेक्निशियनला मायकलच्या परफॉर्मन्सनंतर त्याच्या ड्रेसिंग रूम जवळ सापडले होते. हे सॉक्स त्याने व्यवस्थित जपून ठेवले होते आणि आता ते सॉक्स एका फ्रेममध्ये जतन करण्यात आले आहेत.
फ्रान्सच्या ‘Drouot’ या निलामी संस्थेने या लिलावाचे आयोजन केले होते. सुरुवातीला या लिलावाची किंमत ३,००० ते ४,००० युरो इतकी होती, पण चाहत्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि मागणीमुळे ही किंमत तब्बल ७,६८८ युरोपर्यंत पोहोचली. याआधीही सुद्धा मायकल जॅक्सनच्या काही वस्तू लिलावात विकल्या गेल्या आहेत. आणि त्या वस्तूंना मोठी किंमत सुद्धा मिळालेली आहे. मूनवॉक करताना २००९ मध्ये त्याने वापरलेले ग्लोव्ह ३,५०,००० डॉलर्सना विकले गेले होते. एवढंच नाही तर, २०२३ मध्ये त्याने स्टेजवर टाकलेली फेडोरा टोपी ८०,००० डॉलर्सना विकली गेली होती.
या सॉक्सचा ज्यांनी लिलाव केला त्या ऑरोर इल्ली यांनी या सॉक्सला “मायकल जॅक्सनच्या चाहत्यांसाठी श्रद्धास्थान ठरेल अशी वस्तू” असे वर्णन केले. विकल्या गेलेल्या या वस्तूला एवढी किंमत मिळाली कारण, मायकलने ‘बीली जीन’ या गाण्यावर परफॉर्मन्स करताना ही वस्तू वापरली होती.





