Pune Ganesh Festival : पुण्यातील ‘या’ मंडळांनी घेतला मोठा निर्णय; मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर लगेचच सहभागी होणार!

Pune Ganesh Festival : गणेशउत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गणेश मंडळामध्ये लगभग सुरू झाली आहे. पुण्यातील गणेशउत्सवाची मोठी ख्याती महाराष्ट्रात आहे. यंदाही गणेश मंडळांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाच्या निरोपाच्या दिवशी पुण्यातील लक्ष्मीरोडवर मोठी गर्दी दरवर्षी होत असते. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर इतर गणपती विसर्जनाकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर हिंदुस्थानातील पहिला गणपती भाऊ रंगारी गणतपतीची मिरवणूक सुरू होणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शारदा गणपती म्हणून ओळख असलेला पुण्यातील मंडई गणपती मंडळाने देखील हा निर्णय घेतला आहे. यासंबधीचे पत्र मंडई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपी ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे.
काय म्हटलयं पत्रात?
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 टोजी दुपारी 12.37 वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरू होत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या वेळेच्या आधी म्हणजेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मंडळांनी निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
इतर मंडळांना आवाहन
यावर्षीपासून अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे सायंकाळनंतर नव्हे, तर मानाच्या पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक रविवारी दि. 7 दुपारी 12 पूर्वी संपवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकीसाठी नेमलेली पथकांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही. मागील तीन वर्षातील अनुभव पाहता पोलीस प्रशासनाने वेळेचे पालन न केल्याने आमच्या मूर्ती वेळेत विसर्जनासाठी न्यायला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यंदा आम्ही वेळेपूर्वीच सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्रात म्हटले आहे.
आपण सर्वांनी याला धार्मिक आणि सामाजिक जबाबदारी समजून वेळेच्या आधी विसर्जन मिरवणूक संपवावी, ही नम्र परंतु ठाम अपेक्षा आहे. सर्व मंडळांनी या निर्णयाचे पालन करावे, कुठल्याही विलंबामुळे धार्मिक परंपरेवर गालबोट लागू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी, असे आम्ही सर्व गणेश मंडळांना कळकळीचे आवाहन करीत आहोत.
अण्णा थोरात (अध्यक्ष) अखिल मंडई मंडळ
पुनीत बालन (विश्वस्त, उत्सव प्रमुख) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट





