Relationship । Lifestyle : भारतीय समाजात आजही विवाहाला आयुष्यभर टिकणारे, एक पवित्र नाते मानले जाते. मात्र आधुनिक काळात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय वाढताना दिसते. यामागे विविध कारणे असू शकतात. अनेकदा नात्यातील गोष्टी वेळेवर आणि शांतपणे सोडविल्या जात नाहीत, त्यामुळे पती-पत्नी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. काही लहान चुका नकळत घडतात आणि त्या नात्यात दरी निर्माण करतात, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की महिलांच्या तुलनेत पुरुष भावना कमी व्यक्त करतात. त्यामुळे पुरुषांच्या काही कृती त्यांच्या पार्टनरला दुखावून जातात आणि पुरुषांना मात्र त्याची जाणीवही नसते. एका छोट्या प्रयत्नाने नाते मजबूत होऊ शकते, तर गैरसमज किंवा चुका नात्यात तडेही देऊ शकतात. या लेखात पुरुषांच्या अशाच काही सवयींविषयी जाणून घेऊ, ज्या त्यांच्या महिला जोडीदारांना आतून वेदना देतात आणि ज्याबद्दल त्या अनेकदा बोलतही नाहीत. १. सार्वजनिक ठिकाणी पत्नीला सोबत न नेणे रिलेशनशिपच्या सुरुवातीला अनेक पुरुष पत्नीबरोबर फिरायला, बाहेर जायला उत्सुक असतात. पण काही दिवसांनी ही सवय कमी होत जाते आणि काही पुरुष तर सार्वजनिक ठिकाणीही पत्नीला सोबत नेण्यास नकार देतात. त्यामुळे पत्नीला एकाकीपणा जाणवतो. ही छोटी वाटणारी गोष्ट तिच्या मनाला खोलवर दुखावू शकते आणि नाते कमजोर होऊ शकते. २. पत्नीच्या पोशाखावर अनावश्यक टीका किंवा रोक-टोक प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार असतो. कधी-कधी सौम्य सल्ला देणे योग्य असते, पण काही पुरुष आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडच्या कपड्यांवर सतत टीका करतात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. वारंवार केलेली अशी टीका तिच्या मनात नाराजी आणि दु:ख निर्माण करू शकते. ३. इतरांसमोर जोडीदाराची खिल्ली उडवणे बर्याच पुरुषांना मित्र किंवा नातेवाईकांच्या गप्पांमध्ये विनोद करताना पत्नीबद्दल हलक्या-फुलक्या गोष्टी बोलणे काही मोठे वाटत नाही. पण ‘ही तर नेहमीच जेवणात मीठ जास्त घालते’, किंवा ‘यांची ही सवयच आहे’ असे वाक्य महिलांना आतून दुखावू शकतात. विनोद करताना जोडीदाराची खिल्ली उडवणे हे नात्यातील आदराला तडा देणारे असते. ४. जोडीदाराला स्पेस न देणे काही पुरुषांना पत्नीला स्वतःपासून दूर ठेवायचे नसते ते तिच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतात, दिवसातून अनेकदा फोन करतात, तिला सतत सोबत ठेवण्याचा आग्रह धरतात. अगदी तिच्या घरातील व्यक्तींच्या भेटीलाही ते पत्नीबरोबरच जातात आणि तिला शांत वेळ मिळू देत नाहीत. प्रत्येक व्यक्तीस वैयक्तिक जागा (स्पेस) आवश्यक असते. तिच्यावरील अति नियंत्रण नात्यात तणाव वाढवू शकते. ५. पत्नीच्या कुटुंबावर टीका करणे जसे आपण अपेक्षा करतो की पत्नी आपल्या आई-वडिलांचा आदर करेल, तसेच पतीनेही पत्नीच्या कुटुंबाचा आदर राखणे आवश्यक आहे. काही वेळा घरगुती बोलण्यात किंवा विनोदाच्या नावाखाली पुरुष पत्नीच्या कुटुंबावर प्रश्न उपस्थित करतात किंवा त्यांची खिल्ली उडवतात. हे कोणत्याही महिलेसाठी अत्यंत दुखावणारे असते. अशा वागणुकीमुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. नाते मजबूत ठेवायचे असेल तर एकमेकांचा आदर, समजूतदारपणा आणि संवाद अत्यावश्यक असतो. छोट्या वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा मोठा परिणाम करतात. त्यामुळे आपल्या कृती, बोलणे आणि वागणूक याबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.