सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर आणि शांत मनाने उठावे. उठल्यानंतर सकाळचा वेळ अतिशय सकारात्मकतेने घालवावा. जेणेकरून त्यातून दिवसाची लय निश्चित होते. त्यातून मग मन विचलित होत नाही, आळस येत नाही. सकाळी किंवा पहाटेच्या वेळी अभ्यास केल्यामुळे शेवटच्या क्षणी परीक्षेचा जो ताण येतो किंवा मन घाबरल्यासारखे होते अशा गोष्टी टाळता येतात. अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळा परीक्षेत यश मिळण्यासाठी तुम्ही तासंतास दीर्घकाळ अभ्यास करणे गरजेचे नसते तर अभ्यासात सातत्य असणे आवश्यक असते. त्यासाठी दिवसातील अभ्यासाचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. आपण अभ्यासासाठी जो तीन ते चार तासांचा वेळ निश्चित केलेला आहे, त्या वेळेत एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मग शेवटच्या दिवसात परीक्षेचा ताण येत नाही. मनावरील चिंता कमी होते. लक्ष विचलित होता कामा नये सतत मोबाईलचा वापर करण्याबाबत आत्मपरीक्षण करावे. विशेषतः अभ्यास करताना मोबाईल सायलेंटवर ठेवून लांब ठेवला पाहिजे. अभ्यासावर लक्ष केंद्रित व्हावे आणि आपण जो अभ्यास करतो आहे तो आपल्या मेंदूत साठवला जावा यासाठी अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मोबाईल वरील नोटिफिकेशन्स बंद करा. कुठलाही आवाज मोबाईल मधून अभ्यासाच्या वेळेत येता कामा नये. वक्तशीरपणा वक्तशीरपणा हा एक स्वतः विषयी आदर व्यक्त करण्याचा प्रकार आहे. मग ते वेळेवर पोहोचणे असो किंवा मीटिंगची डेडलाईन पाळणे असो, वर्गात वेळेआधी उपस्थित असणे असो! वेळ पाळण्यातूनच स्वतःची विश्वासार्हता प्रगट होते. त्यासाठी स्वतःच्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या कौशल्यात सुधारणा करणे आवश्यक ठरते. त्यातून वैयक्तिक शिस्त दिसून येते. मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी टप्पे निश्चित करा तुमचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी छोट- छोटे टप्पे निश्चित करा. ठराविक कालावधीमध्ये ते टप्पे साध्य होत आहेत याचे परीक्षण करत रहा. यातून शिकणे अधिक उत्साहवर्धक ठरते आणि आपण आपल्या प्रगतीचा लेखाजोखा ठेवू शकतो. त्यातून आपल्याला रोज, दर आठवड्याला, महिन्याला आपण कुठपर्यंत आलो आहोत काय कामगिरी केलेली आहे हे समजते आणि त्यातून पुढे जात राहण्याची प्रेरणा मिळते. सजगपणे ब्रेक घ्या विद्यार्थ्यांनी अधून मधून जाणीवपूर्वक ब्रेक घ्यावा. ज्यामुळे आपले मन रिचार्ज होते आणि आपण अधिक उत्साहाने कामाला लागू शकतो. त्यासाठी अभ्यास करत असताना दर तासाला पाच ते दहा मिनिटे ब्रेक घेऊन स्ट्रेचिंग करणे, जागच्या जागी चालणे उपयुक्त ठरते. स्व-नियंत्रण जेव्हा आपल्याकडे कोणीही पाहत नसते किंवा आपल्यावर कुणाचेही लक्ष नसते तेव्हा शिस्त पाळण्यातून आपले खरे संस्कार कळतात. त्यामुळे कोणीही आठवण करून न देता आपले ठरलेले रोजचे रुटीन पाळणे आवश्यक ठरते. त्यातून स्वतःवरचा विश्वास अधिक वाढतो आणि दीर्घकालीन यशासाठी ही सवय अतिशय उपयोगी ठरते. शिस्त स्वतःपासून सुरू होते यश हे दबावामुळे प्राप्त होत नाही तर ते सातत्यपूर्ण सवयींमुळे प्राप्त होते. त्यामुळे स्वतःमध्ये आज एकच बदल करा आणि मग पहा की त्यामुळे तुमच्या एकाग्रतेवर काय परिणाम होतो, रोजच्या दैनंदिन वर काय परिणाम होतो आणि आत्मविश्वासावर काय परिणाम होतो.