मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या युतीने आज (२ जानेवारी) दादर येथील शिवसेना भवनमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम घेतला. मनसे नेते अमित ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले, तर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यासोबत युतीच्या २२७ उमेदवारांना मुंबईच्या विकासाबाबत मार्गदर्शन केले. अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत अमित ठाकरेंनी कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “हा शब्द ठाकरेंचा…! आज आदित्यने आणि मी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांशी संवाद साधला. ही फक्त निवडणुकीची तयारी नव्हती, तर मुंबईकरांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही जो आराखडा तयार केला आहे, त्याचं सादरीकरण होतं.” मुख्य वचन आणि घोषणा मराठी माणसांसाठी ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरं (अमित ठाकरे यांची घोषणा). ७०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांची मालमत्ता कर माफ. घरकाम करणाऱ्या महिलांना नोंदणीकृत करून दरमहा १,५०० रुपये स्वाभिमान निधी. बेस्ट बसेसचे दर कमी करणे. मुंबईत ५ नवीन मेडिकल कॉलेजेस आणि जागतिक दर्जाचे कॅन्सर स्पेशालिस्ट रुग्णालय. मोफत पार्किंग (महापालिका जागांवर), स्वच्छ प्रसाधनगृहे, स्वच्छ हवा आणि मोठी मैदाने. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष भर, रोजगार संधी वाढवणे. १०० युनिटपर्यंत मोफत वीज अमित ठाकरेंनी युतीच्या निष्ठेवर जोर देत सांगितले की, “आपल्या सहकाऱ्यांनी कार्यालय फोडलं नाही, एबी फॉर्म गिळला नाही, शिवीगाळ केली नाही, मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आणि ही निष्ठा असते. हाच फरक आहे, आपल्यात आणि त्यांच्यात.”आदित्य ठाकरेंनी ‘शब्द ठाकरेंचा’ असा नारा देत मुंबईकरांसाठी हक्काचं घर, रोजगार, स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर भर दिला. हे निवडणूक फक्त जिंकण्यासाठी नाही, तर मुंबईला नव्या उंचीवर नेण्यासाठी असल्याचे ते म्हणाले.