Kitchen Hacks: किचनमधल्या ‘या’ ७ सवयींमुळे वाढतो कामाचा पसारा; आजच बदला तुमची पद्धत!
Kitchen Hacks किचनमध्ये काम करताना योग्य नियोजन आणि वस्तूंची आधीच तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या काही सवयी बदलल्यास स्वयंपाक करणं आणि त्यानंतरची साफसफाईही सोपी होऊ शकते.

Kitchen Hacks: स्वयंपाकघरातील काम हे रोजचंच असतं. स्वयंपाक करणे, भाज्या चिरणे, भांडी घासणे आणि किचनची साफसफाई करणे या सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळ जातो. मात्र, अनेकदा आपल्याच काही छोट्या सवयींमुळे हे काम आणखी वाढतं. काही गोष्टी आधीच नियोजन करून केल्या, तर स्वयंपाकघरातील वेळ आणि मेहनत दोन्ही कमी करता येऊ शकतात.
किचनमध्ये काम करताना योग्य नियोजन आणि वस्तूंची आधीच तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या काही सवयी बदलल्यास स्वयंपाक करणं आणि त्यानंतरची साफसफाईही सोपी होऊ शकते. जाणून घेऊया अशाच सात सवयींबद्दल…
१. तयारी न करता स्वयंपाक सुरू करणे
अनेकदा आपण थेट स्वयंपाकाला सुरुवात करतो. भाजी, मसाले किंवा इतर साहित्य शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा फ्रिज, मसाल्याचा डबा किंवा स्टोअर रूममध्ये जावं लागतं. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाढतात. त्यामुळे स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी लागणारं सर्व साहित्य एकाच ठिकाणी काढून ठेवावं. भाज्या धुवून आणि चिरून घ्याव्यात. यामुळे स्वयंपाक करताना काम अधिक वेगाने करता येतं.
२. एकच काम वारंवार करणे (Kitchen Hacks)
समजा, चार वेगवेगळ्या पदार्थांसाठी कांदा लागणार आहे. तर प्रत्येक पदार्थासाठी वेगळा कांदा चिरण्याऐवजी आवश्यक तेवढा कांदा एकदाच चिरून ठेवता येतो. यामुळे चाकू, चॉपिंग बोर्ड आणि इतर साहित्य पुन्हा पुन्हा वापरण्याची गरज कमी होते.
३. कचऱ्यासाठी जवळ डबा न ठेवणे (Kitchen Hacks)
भाजी चिरताना निघणारे देठ, साले आणि इतर कचरा टाकण्यासाठी प्रत्येक वेळी कचरापेटीकडे जाणं हा वेळखाऊ प्रकार ठरू शकतो. त्याऐवजी चॉपिंग बोर्डजवळ एक छोटा कचऱ्याचा डबा ठेवावा. भाजी चिरताना निघालेला कचरा लगेच त्यात टाकता येतो. स्वयंपाकघरही व्यवस्थित राहतं आणि कामाचा वेगही वाढतो.

Kitchen Hacks: किचनमधल्या ‘या’ ७ सवयींमुळे वाढतो कामाचा पसारा; आजच बदला तुमची पद्धत!
४. रेसिपी पूर्ण न वाचता स्वयंपाक सुरू करणे
काही वेळा पदार्थ अर्धा तयार झाल्यानंतर लक्षात येतं की एखादा महत्त्वाचा पदार्थ घरातच नाही. कधी एखादी डाळ किंवा कडधान्य आधी भिजवायचं असतं, तर एखादा पदार्थ आधी उकळण्याची गरज असते. त्यामुळे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून घ्यावी. कोणते साहित्य लागणार आहे आणि कोणती तयारी आधी करायची आहे, हे समजल्यामुळे स्वयंपाकात गोंधळ होत नाही.
५. गरजेपेक्षा जास्त भांडी वापरणे
प्रत्येक छोट्या कामासाठी वेगळं भांडं काढल्यास स्वयंपाकानंतर भांड्यांचा ढीग तयार होतो. त्यामुळे शक्य असेल तिथे कमी भांड्यांचा वापर करावा. एखादं भांडं धुऊन पुन्हा वापरता येत असेल तर तसं करणं अधिक सोयीचं ठरतं.
६. चाकूच्या धारकडे दुर्लक्ष करणे
धार नसलेल्या चाकूने भाजी चिरण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे चाकूची धार योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. चांगल्या धार असलेल्या चाकूने भाज्या अधिक सहजपणे आणि नियंत्रित पद्धतीने चिरता येतात. तसंच भाज्या शक्य तितक्या समान आकारात चिरल्यास त्या व्यवस्थित आणि एकसमान शिजण्यास मदत होते.
७. स्वयंपाक करताना साफसफाई न करणे
स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण किचन साफ करण्याची सवय अनेकांची असते. त्यामुळे शेवटी एकाच वेळी खूप काम जमा होतं. त्याऐवजी स्वयंपाक करतानाच छोट्या-छोट्या गोष्टी आवरत राहाव्यात. वापरलेले डबे जागेवर ठेवणे, रिकामी भांडी बाजूला काढणे, मोठी भांडी शक्य तितक्या लवकर धुणे आणि चॉपिंग एरिया स्वच्छ ठेवणे यामुळे शेवटची साफसफाई सोपी होते.
एकूणच, किचनमधील काम कमी करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. रोजच्या छोट्या सवयींमध्ये बदल केला तरी वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतात. थोडं नियोजन, योग्य तयारी आणि काम करतानाच आवराआवर केली, तर स्वयंपाकघरातील रोजचा पसारा नक्कीच कमी करता येईल.





