Better Sleep: रात्री वारंवार जाग येतेय? तुमच्या या ५ सवयी असू शकतात खराब झोपेमागचं मोठं कारण
Better Sleep रात्री नीट झोप न झाल्यास दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड वाढते. दीर्घकाळ झोपेचा अभाव राहिल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.

Better Sleep: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक लोकांना झोपेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, सतत मोबाईल वापरणं, अनियमित दिनचर्या आणि वाढलेला ताण यामुळे चांगली झोप मिळणं कठीण झालं आहे. लहान मुलांपासून तरुण, विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणींपर्यंत अनेक जण अनिद्रेच्या समस्येने त्रस्त आहेत.
रात्री नीट झोप न झाल्यास दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड वाढते. दीर्घकाळ झोपेचा अभाव राहिल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होणं अशा समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, आपल्या काही रोजच्या सवयी यासाठी कारणीभूत असतात. या सवयी वेळेवर बदलल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
१. जास्त ताण आणि चिंता (Better Sleep)
सतत तणावाखाली राहणाऱ्या लोकांना झोपेच्या समस्या अधिक जाणवतात. कामाचा ताण, अभ्यासाचा दबाव, आर्थिक चिंता किंवा वैयक्तिक समस्या यामुळे मन शांत राहत नाही. परिणामी, झोप येण्यास उशीर होतो किंवा रात्री वारंवार जाग येते.
अशावेळी ध्यानधारणा, श्वसनाचे व्यायाम आणि स्वतःसाठी काही शांत वेळ काढणं फायदेशीर ठरू शकतं. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहिल्यास मन शांत होतं आणि झोप चांगली लागते.
२. अनियमित दिनचर्या
काही लोक रोज वेगवेगळ्या वेळेला झोपतात आणि उठतात. सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणं आणि कामाच्या दिवशी लवकर उठणं यामुळे शरीराचं नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडतं. चांगल्या झोपेसाठी रोज एकाच वेळेला झोपणं आणि उठणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सुट्टीच्या दिवशीही हा नियम पाळल्यास झोपेचा दर्जा सुधारतो.

Better sleep
३. कॅफिन आणि निकोटिनचं जास्त सेवन
दिवसभरात वारंवार चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स किंवा धूम्रपान केल्याने मज्जासंस्था सतत सक्रिय राहते. त्यामुळे रात्री झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. विशेषतः संध्याकाळी ६ नंतर कॅफिनयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला शांत होण्यासाठी वेळ मिळतो आणि झोप सहज लागते.
४. उशिरा आणि जड जेवण करणं
रात्री उशिरा जेवण करणं किंवा जास्त मसालेदार, तेलकट आणि जड पदार्थ खाणं हे देखील झोपेवर परिणाम करतं. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीराला विश्रांती मिळत नाही. तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या किमान तीन तास आधी हलकं जेवण करावं. रात्री भूक लागल्यास जंक फूडऐवजी दूध, ओट्स बिस्किटं किंवा पीनट बटर टोस्टसारखे हलके पदार्थ खावेत.
५. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याची सवय
आजच्या काळात झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणं ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. सोशल मीडिया स्क्रोल करणं, व्हिडिओ पाहणं किंवा सतत वेळ तपासणं यामुळे मेंदू सक्रिय राहतो.
मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे झोप उशिरा लागते. झोपण्यापूर्वी मोबाईल बेडपासून दूर ठेवावा. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचणं, शांत संगीत ऐकणं किंवा मंद प्रकाशात आराम करणं अधिक फायदेशीर ठरतं.
चांगली झोप ही निरोगी आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल करणं गरजेचं आहे. योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या पाळल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते आणि संपूर्ण आरोग्यही चांगलं राहू शकतं.





