पिंपरी | ‘मतदारसंघात थोरवेंना तोंड दाखवायला जागा राहिली नसती’

खालापूर, (वार्ताहर) – विधानसभेच्या निवडणूकीत युतीचा धर्म पाळला नाहीतर श्रीवर्धनमध्ये शिंदे गटाचा उमेदवार उभा करू असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता. त्यावर आमदार थोरवे यांनी स्वतः श्रीवर्धनमधून उमेदवारी लढवावी, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि आदिती तटकरे तुमची वाट बघतायेत असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधारकर घारे यांनी दिला आहे.
तसेच मावळ लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीने काम केले नसते तर कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात थोरवेंना तोंड दाखवायला जागा राहिली नसती, असा घणाघात घारेंनी आमदार थोरवेंवर केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी, श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार उभा करू असा इशारा दिला होता. त्याला उत्तर देण्यासाठी सुधाकर घारे यांनी खालापूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, भरत भगत, अंकीत साखरे, एच.आर. पाटील, सुरेखा खेडकर, संतोष बैलमारे, भगवान चंचे, भाऊ कोळंबे, भूषण पाटील उपस्थित होते.
‘आमदार थोरवे वारंवार बोलतात महायुतीचे काम करायचे नसेल तर युतीतून बाहेर पडा. हे कोण अध्यक्ष आहेत का? तिनही पक्षाने जबाबदारी दिली आहे का? महायुतीतील वरिष्ठ नेते ठरवतील कुणाला उमेदवारी द्यायची ते,’ असे घारे यावेळी बोलताना म्हणाले.





