satara | घेवडा, वाटाण्याच्या पेरणीत वाढ होणार

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्तर कोरेगाव परिसरात गेल्या वर्षी ऊसाचे क्षेत्र कमी झाले असून सध्या उन्हाळी पाऊस जेमतेमच झाल्याने आडसाली उसाची लागण होणार नाही. त्याचा परिणाम या भागात घेवडा, वाटाणा, सोयाबीन या पिकाच्या पेरणीत वाढ होणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे उत्तर कोरेगावात गेल्या वर्षी ऊसाची लागण झाली नाही. त्यात विहिरीना पाणी कमी पडल्याने ऊसाचे क्षेत्र वाळून गेले. ऊसाची तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस काढून शेताची मशागत करून ठेवली आहे. जून महिन्यात आडसाली उसाची लागण होते.
मात्र, यावर्षी उन्हाळी पाऊस परिसरात कमी जास्त झाला असला तरी अजून विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नसल्याने परिणामी या भागात आडसाली उसाची लागण होणार नाही. येथील शेतकरी शेतीची मशागत करून घेवडा, वाटाणा, सोयाबीन ही पिके घेण्याच्या तयारीत आहेत.
सध्या बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होत असून घेवडा बियाणे ११० ते १४० रुपये प्रति किलो, वाटाणा २०० ते ३०० रुपये प्रति किलो, तर सोयाबीन १०० रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना खरेदी करावी लागणार आहे. पेरणीसाठी येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून मान्सून पाऊस चालू झाल्यानंतर खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.





