- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
- पेठ क्रमांक 22 मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
पिंपरी – पेठ क्रमांक 22 येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेडझोन हद्दीत येत असल्याने सध्या न्यायप्रविष्ट आहे. या गृहप्रकल्पातील बांधून तयार असलेल्या घरांचे त्यामुळे अद्याप वाटप झालेले नाही. येथील किती क्षेत्र रेडझोन हद्दीमध्ये येत आहे, याचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नगर भूमापन विभागाला याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. देहूरोड येथील दारूगोळा कोठाराच्या सीमाभिंतीपासून 2 हजार यार्ड अंतरात येत असलेल्या भागाचे यापूर्वी सर्वेक्षण झालेले आहे. मात्र, पेठ क्रमांक 22 येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेडझोन हद्दीत येत असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांचे वाटप करण्यास न्यायालयाने सध्या स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे येथील सदनिकांचे वाटप रखडले आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. उच्च न्यायालयाने पेठ क्रमांक 22 येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील किती क्षेत्र रेडझोन हद्दीत येते, याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार त्याबाबतचे सर्वेक्षण पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नगर भूमापन कार्यालयाकडून 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला महापालिका नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक रा. म. पवार व अन्य अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, नगर भूमापन अधिकारी, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी आणि प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.