सातारा -जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षातील 14 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच नवे दोन संशयित तसेच रुग्णाच्या सहवासातील 10 जणांच्या पुनर्तपासणीसाठी अशा 12 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा 10 नागरिकांना बाधित रुग्णाचे सहवासातील म्हणून 14 दिवसानंतरच्या पुनर्तपासणीकरीता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात व फलटण येथे प्रत्येकी 1 अशा एकूण 12 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.