महाराष्ट्र निवडणुकीत मत चोरी नाही; लोकनीती-CSDS संस्थेच्या संजय कुमारांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांच्या संख्येत घटीचा दावा करणारी लोकनीती-CSDS संस्थेची आकडेवारी चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संस्थेचे सह-संचालक प्राध्यापक संजय कुमार यांनी त्यांच्या चुकीच्या पोस्टबद्दल माफी मागितली असून, संबंधित पोस्ट एक्सवरून डिलीट केली आहे. आता या प्रकरणावरून भाजपने राहुल गांधी आणि लोकनीती-CSDS संस्थेवर जोरदार टीका केली आहे. भाजपने म्हटले आहे की ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात.
संजय कुमार यांचा दावा चुकीचा –
संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एक्सवर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांच्या संख्येत मोठी घट झाल्याचा दावा केला होता. त्यांच्या मते, रामटेकमध्ये लोकसभा निवडणुकीत ४,६६,२०३ मते होती, तर विधानसभा निवडणुकीत ती २,८६,९३१ इतकी कमी झाली, म्हणजेच ३८.४५ टक्के मतांची घट. त्याचप्रमाणे, देवळाली मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४,५६,०७२ मते होती, तर विधानसभा निवडणुकीत २,८८,१४१ मते, म्हणजेच ३६.८२ टक्के मतांची घट झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
I sincerely apologize for the tweets posted regarding Maharashtra elections.
Error occurred while comparing data of 2024 LS and 2024 AS. The data in row was misread by our Data team.
The tweet has since been removed.
I had no intention of dispersing any form of misinformation.— Sanjay Kumar (@sanjaycsds) August 19, 2025
माफी आणि पोस्ट डिलीट –
मात्र, मंगळवारी संजय कुमार यांनी या पोस्टबद्दल माफी मागितली आणि ती डिलीट केली. त्यांनी लिहिले, “महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित ट्विटसाठी मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना आमच्या डेटा टीमने चुकीचा अर्थ लावला. ट्विट डिलीट करण्यात आले आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.”
भाजपची टीका –
भाजपने या प्रकरणावर संजय कुमार आणि लोकनीती-CSDS वर तीव्र टीका केली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर लिहिले, “संजय कुमार यांनी माफी मागितली, पण ही प्रामाणिक चूक नाही. काँग्रेसच्या खोट्या आरोपांना बळ देण्यासाठी CSDS ने पडताळणीशिवाय आकडेवारी जाहीर केली. हा विश्लेषण नव्हे, तर उघड पक्षपात आहे. राहुल गांधी ज्या संस्थेच्या आकडेवारीवर अवलंबून होते, त्यांनीच आता आपला डेटा चुकीचा असल्याचे कबूल केले आहे.”
The very institution whose data Rahul Gandhi leaned on to defame the voters of Maharashtra has now admitted that its figures were wrong — not just on Maharashtra, but even on SIR.
Where does this leave Rahul Gandhi and the Congress, which brazenly targeted the Election… pic.twitter.com/4o99YDvsMx
— Amit Malviya (@amitmalviya) August 19, 2025
निवडणूक आयोग आणि विरोधकांमध्ये वाद –
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा निवडणूक आयोग आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांमध्ये मत चोरीच्या आरोपांवरून तणाव आहे. राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी बेंगळुरूत महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मतांच्या हेराफेरीचा आरोप केला होता. तसेच, बिहार दौऱ्यात त्यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा कट रचल्याचा आरोप केला. दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांना या आरोपांसाठी माफी मागण्यास सांगितले आहे, तर विरोधकांनी उलट आयोगाकडून माफीची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा टोला –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “लोकनीती-CSDS ने आपली आकडेवारी चुकीची असल्याचे मान्य करत माफी मागितली आहे. या आकडेवारीवर आधारित राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि आमच्या सरकारवर गंभीर आरोप केले होते. आता राहुल गांधी माफी मागतील का? मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. राहुल गांधी हे ‘सिरियल लायर’ आहेत. ते रोज खोटे बोलत राहतील आणि चुकीची आकडेवारी मांडत राहतील. पण आज जनतेसमोर सत्य समोर आले आहे.”
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण –
निवडणूक आयोगानेही यापूर्वी असे दावे फेटाळले असून, मतांच्या आकडेवारीत कोणतीही हेराफेरी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता लोकनीती-CSDS च्या माफीमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.





