करोनाचा आघात झालेल्यांवर अन्याय होऊ नये

- डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
- उपसमिती स्थापन करा
पिंपरी- करोनामुळे अनाथ झालेली बालके, विधवा यांच्यावर अन्याय होऊ नये, याकडे लक्ष द्या. तसेच अनाथ मुले व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्याकरिता महापालिका व पोलीस प्रतिनिधींचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करा. या उपसमितीने पुनर्वसनाचा आराखडा तयार करुन त्याचा अहवाल तयार एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी सोमवारी (दि. 23) पिंपरी चिंचवड महापालिकेस भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी करोनाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, नगरसेवक ऍड. सचिन भोसले, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत करोनामुळे आई-वडील गमावलेली बालके, एकल विधवा, असंघटीत कामगारांना आर्थिक मदतीचा आढाव घेण्यात आला. करोनामुळे 2200 महिला विधवा झाल्या आहेत. एक पालक असलेली 359 बालके असून शहरातील 18 बालकांनी आपले आई-वडील गमावले आहेत. याशिवाय महापालिका सेवेतील 21 कर्मचारी पोलीस दलातील चार कर्मचारी करोनामुळे मयत झाले आहेत. या सर्व घटकांच्या पुनर्वसनाकरिता राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी घेतली.
नोंदणीसाठी विशेष मोहीम
करोनाकाळात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना लाभ मिळवून देण्याकरिता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, नोंदणीकृत कामगारांबरोबरच समाजातील महापालिकेने कामगार कल्याण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुंभार, नाभिक यांसारख्या अन्य 40 गरजू घटकांचे सर्वेक्षण करुन, त्यांचादेखील लाभार्थ्यांमध्ये समावेश करावा. 1 ते 9 सप्टेंबर या कालावधीत बांधकाम, घरेलू तसेच वेगवेगळ्या कामात कार्यरत कामगारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
हे होऊ देऊ नका…
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तसे विधवांची मालमत्ता हडप करण्याचे प्रयत्न होऊ शकतो. याशिवाय ही अनाथ बालके बालमजूर अथवा मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय मयत व्यक्तीने काढलेले कर्ज त्याच्या पत्नीकडून वसूल करण्याचे प्रयत्न होत आहेत. या बाबी टाळण्याकरिता महापालिका प्रशासनाने अशा बालकांच्या मालमत्तेची निगराणी करावी. त्याकरिता पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे निर्देश दिले.





