“आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अर्थसंकल्प नसावा, सामान्य लोकांचा अर्थसंकल्प हवा” : रोहित पवार

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात चांगलीच वादळी झाली. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. शिंदे-फडणवीस सरकार आज त्यांचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना गृहीत धरुन मांडला जाईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवा यांनी व्यक्त केली आहे.
आज मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगार यांना गृहीत धरुन मांडला जावा अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी आपण पाहिलं पुरवणी मागण्या झाल्यानुसार काहीही या सरकारने केलं नाही. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं हे बजेट मांडू नये असेही रोहित पवार म्हणाले.
सामान्य लोकांचे हे बजेट असावं. मुंबईवर जास्त फोकस असण्याची शक्यता आहे. मात्र ते करताना सर्वच शहरत चांगले प्रोजेक्ट राबवावे असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, सरकारनं ज्या कामांना स्थगिती दिली आहे, त्यावरील स्थगिती उठवावी अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेले 60 टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक पाहणी अहवालत मोठी घट सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यावर या सरकारनं लक्ष द्यायला हवं असे रोहित पवार म्हणाले. ज्या-ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तिथं चांगला निधी दिला जाईल असेही रोहित पवार यांनी सांगितले.





