Sharad Pawar : बुधवारी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना, आंदोलनाची भूमिका आणि महाविकास आघाडीतील समन्वय यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, सर्वाधिक चर्चेत राहिलेला तो अजित पवार गटासोबतच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा. या मुद्याला पूर्णविराम देण्यात आल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीत काही आमदार आणि खासदारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, असा थेट सवाल उपस्थित केला. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रश्नावर शरद पवार यांनी मौन बाळगले. तर खासदार सुप्रिया सुळे आणि नेते जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी या भूमिकेमुळे पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. अनेक नेत्यांनी शरद पवार यांनी स्वतः विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा बाळगली आहे. त्यामुळे शरद पवार आगामी काळात मोठा निर्णय घेणार का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातही नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्या गटातील २२ आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अधिक हवा मिळाली होती. मात्र, या चर्चा आता हवेतच विरळ झाल्या असल्याचे बोलले जात आहे. Sharad Pawar NCP गेल्या आठवड्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी वेग आला होता. मात्र, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर येत दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत राज्यभर पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चांगला समन्वय असल्याचे सांगत, जनतेच्या प्रश्नांवर पक्ष अधिक आक्रमकपणे लढेल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. हेही वाचा : Trisha Krishnan : ‘माय मॅजिकल…’; त्रिशा कृष्णनकडून पोस्टमध्ये ‘विजय’चा उल्लेख