पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात अनेक परिसरांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेकदा मोर्चे आणि आंदोलने देखील झाली आहेत. सर्वांना समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे, परंतु महापालिकेच्याच क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. ग क्षेत्रीय कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. फिल्टर बसवूनही त्यामध्ये पाणी सोडले जात नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना पिण्यासाठी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज थेरगाव शाळेच्या इमारतीमधून चालत होते. अधिकाऱ्यांना बसायला जागेची कमतरता, नागरिकांसाठीच्या आसनव्यवस्थेची वानवा, प्रशासकीय कामकाजासाठी लागणारी जागा अपुरी पडू लागल्याने महापालिकेने कैलासनगरमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयासाठी सुसज्ज इमारत बांधली. त्याठिकाणी हे कार्यालय स्थलांतरित केले. त्याला एक वर्षभराचा कालावधी उलटला तरी त्याठिकाणी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी फिल्डर टाकी बसविण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये पाणी सोडले जात नाही. त्यामुळे टाकीची दुरवस्था झालेली आहे. वरील झाकण निखळून पडले आहे. नळाची दरुस्ती करण्याची गरज आहे.