जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण
पुणे – कारखान्यामधील किंवा औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी किंवा कामगाराला करोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ऍपवरून फॉरवर्ड केले जात आहेत, असे फॉरवर्ड केले जाणारे मेसेजेस चुकीचे आहेत. हे मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नयेत तसेच या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.
करोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. ज्या भागात कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी करोना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.