मुंबई : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी देशात औषधांची कमतरता नसल्याचे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री व्ही. सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. ते आज गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
उत्तम निगराणी आणि देखरेख प्रणालीमुळे भारतात या रोगाचा प्रसार रोखण्यात सरकार यशस्वी ठरले आहे असे ते म्हणाले. करोनाच्या जागतिक संसर्गामुळे औषध क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून अनेक संधीही खुल्या झाल्या आहेत.
वाढती लोकसंख्या आणि आरोग्याप्रति वाढती जागरुकता यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीला आणखी वाव आहे. नवीन संधींचा योग्य वापर केल्यास देशातील औषध उद्योगांची उलाढाल 2025 पर्यंत 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत जाईल असे ते म्हणाले.
करोनाग्रस्त देशांसाठी जागतिक बॅंकेकडून 12 अब्ज अमेरिकी डॉलरची मदत
करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना मदत म्हणून जागतिक बॅंकेने 12 अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी ही माहिती दिली. ज्या देशाला या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या देशाला जास्त निधी देण्यात येईल. सर्व देशांबरोबर बॅंकेने याबाबतीत संपर्क साधला आहे असेही त्यांनी सांगितले.