खासगी ट्रॅव्हल्सकडूनही हंगामी दरवाढ नाही

प्रवाशांना दिलासा : एसटी महामंडळाकडूनही दरवाढ न करण्याचा निर्णय

पुणे – भाडेवाढीच्या संदर्भात राज्याच्या परिवहन विभागाने आणलेली बंधने आणि सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था असलेल्या एसटी महामंडळाने यंदा हंगामी दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गर्दीच्या काळात मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे चालक दुहेरी संकटात सापडले आहेत. मात्र, व्यवसायावर परिणाम नको म्हणून त्यांनीही यंदा हंगामी दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा दिलासा मिळणार आहे.

सुट्ट्या आणि गर्दीच्या कालावधीत खासगी बसचालक प्रवाशांकडून मनमानी पध्दतीने भाडे आकारत होते. त्यांच्याकडून दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी केली जात होती. विशेष म्हणजे प्रवाशांची मागणी आणि संख्या वाढल्यास त्यांच्या दरामध्ये आणखीनच वाढ होत होती. त्याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात वकिल ऍड. असिम सरोदे यांनी यासंदर्भात राज्याच्या परिवहन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने यासंदर्भात संबंधित बचालकांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा मनमानी चालकांची आणि ते आकारत असलेल्या भाड्याची तपासणी करण्यासाठी पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने गेल्या वर्षभरात राज्यभर धाडसत्र राबवित दंडात्मक कारवाई केली होती. तसेच, ही मनमानी पध्दत बंद न केल्यास थेट परवाना रद्द करण्याची तंबी दिली होती. त्यामुळे बहुतांशी खासगी बसचालक ताळ्यावर आले आहेत. शिवाय, यंदा एसटी महामंडळानेही हंगामी दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे बसचालक दुहेरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी ही दरवाढ न करण्याचा निर्णय या बसचालकांनी घेतला असून सर्व व्यवसायिकांना त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

संगमवाडी येथील खासगी ट्रॅव्हल्सचे सेंटर चालक रफिक तांबोळी म्हणाले, वर्षभर व्यवसाय होत नसल्याने सुट्ट्यांच्या कालावधीत या वाढीव दराची आकारणी केली जाते. त्यातून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करण्याचा आमचा हेतू नाही. मात्र, यंदा कोणत्याही परिस्थितीत ही भाडेवाढ केली जाणार नाही.

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य शासन आणि परिवहन विभागाची आहे. मात्र, त्यांचे नियंत्रण नसल्यानेच अशा पध्दतीने भाडेवाढ करण्यात येत आहे. आता यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेला निर्णय योग्यच असून त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
– महेश भांडवलकर, प्रवासी, अमरावती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.