“यूपीएच्या अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; सुशीलकुमार शिंदेंचा खोचक टोला

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे यूपीएचे अध्यक्ष व्हावेत यासाठी अनेक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या युवक आघाडीनेही त्याबाबतचा ठराव केला होता तो ठराव मंजूर देखील करण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार हेच यूपीएचे अध्यक्ष होणार असे म्हटले जात आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार अध्यक्ष व्हावेत अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना खोचक टोला लगावला आहे.
राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाहीये, असा चिमटा सुशील कुमार शिंदे यांनी काढला आहे. तसेच जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. पुन्हा पुन्हा जाती धर्माचे राजकारण चालणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलणं टाळलं. तुम्ही त्यांनाच विचारा, असं शिंदे म्हणाले. पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते, त्यावर शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सध्या सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही जो काळ अनुभला आहे, त्यावेळी संयम होता. मात्र परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, उच्चवर्णीय लोकच दंगल घडवतात या सुजात आंबेडकर यांच्या विधानाशी त्यांनी असहमती दर्शवली. दंगलीचा आणि जातीचा काही संबध नाहीये, असे ते म्हणाले.





