पिंपरी – चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दुसरे पत्र दिले आहे. महापालिका आयुक्त आणि आमदार जगताप यांच्यात सध्या आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच आमदारांनी आयुक्त यांना पत्र देत तब्बत 46 विषयांची माहिती मागविली होती. आता पुन्हा आमदार जगताप यांनी पत्र देत नवीन विषयांची माहिती मागविली आहे. गेल्या अनेक दिवस आयुक्तांना मोकळ्या हाताने काम करू देणारे आमदार अचानक आयुक्तांवर अविश्वास दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात सद्यस्थितीत सुरु असलेल्या देखभाल व दुरुस्ती विषयक, रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, विद्युत, जलःनिसारण, स्थापत्य, उद्यान विभागांच्या कामाची माहिती मागितली आहे. तसेच प्रभागातील शासकीय इमारतींची देखभाल, दुरुस्ती व इतर देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा तपशीलही मागितला आहे. या कामांच्या निविदा व संबंधित ठेकेदारांची माहिती मागविली आहे. आमदार जगताप यांनी 9 जुलै रोजी आयुक्तांना पहिले पत्र पाठविले होते.
त्यामध्ये त्यांनी आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता पंधरा दिवसांनी पुन्हा आमदारांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये विविध विषयांची माहिती त्यांनी मागविली आहे. त्यामुळे आमदार व आयुक्त यांच्यामधील शीतयुद्धाचा दुसरा अंक आज बघायला मिळाला आहे.