फिरते हौद कागदावरच “फिरणार’ ! पुणे महापालिकेच्या निविदांना प्रतिसादच नाही

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – यंदा शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असल्याने महापालिकेने यंदा शहरात तब्बल 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यासाठी काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनास फेरनिविदा काढावी लागली आहे. या कामासाठी 1 कोटी 32 लाख रुपयांची निविदा काढली जाणार आहे. मात्र, या कामास सजग नागरिक मंचाने आधीच आक्षेप घेतला असून हा खर्च अनावश्यक असल्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.
करोना काळात विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने नदीकाठचे हौद बंद ठेवले होते. तसेच महापालिकेने शहरात सुमारे 100 हून अधिक ठिकाणी पाणीटाक्याही उपलब्ध करून दिल्या. 2019 मध्ये 30 फिरते विसर्जन हौद तर 2021 मध्ये 60 फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात आलेले होते. आता यावर्षी विसर्जन हौद, बांधीव घाट, पाण्याच्या टाक्या महापालिका उपलब्ध करून देणार असली तरी यंदा तब्बल 150 फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी मागील आठवडयात निविदाही मागविण्यात आली होती. मात्र, एकही निविदा न आल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे.





