“माझ्या मतदारसंघात येऊन शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” योगेश कदमांनी नितेश राणेंना सुनावले

Yogesh Kadam on Nitesh Rane | दापोलीमधील एका सभेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. ‘ज्यांनी आमच्या मुलांना दगड मारले त्यांना कोण वाचवत आहे, हा सगळा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल, तेव्हा यांचे फोन बंद होतील. यांच्या खुर्च्या जातील,’ अशी जहरी टीका नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या केली होती. या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नका’
“मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजलंय. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावं. आमच्या हातात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये. माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” असा टोला योगेश कदम यांनी लगावला.
‘दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहा’
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी गृहविभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करत आहे. शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे. आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो,” असे योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावले.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
दापोलीमध्ये नितेश राणे यांनी हर्णेमधील दगडफेक प्रकरणातील कारवाईवरुन योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. “यापुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं,”असे नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.
हेही वाचा :





