साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची माहिती पुणे – शहरात करोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असावा, अशी भीती सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. पण, तज्ज्ञांनी मात्र ती फेटाळली आहे. पुण्यात अजून करोनाचा सामूहिक संसर्ग आढळला नाही, असे साथरोग विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले. फेसबुकवर आयोजित एका चर्चासत्रात डॉ. आवटे बोलत होते. त्यावेळी “पुण्यातील करोना बाधितांची वाढती संख्या पाहता आपण स्टेज-3 मध्ये गेलो आहोत का?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर डॉ. आवटे म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे, ज्यावेळी एका भागात एकदम बाधित व्यक्ती सापडतात आणि त्याला संसर्ग कोठून, कसा झाला याची हिस्ट्री समोर येत नाही. त्याठिकाणी सामूहिक संसर्ग झाला, असे म्हणता येईल. सध्या पुणे शहरातील काही तुरळक ठिकाणी असे दिसून येते. त्याबाबत सर्वसामान्य व्यक्ती प्रश्नही विचारतात. त्याबाबत त्यांच्या मनामध्ये भीती आहे. परंतु, हे प्रमाण ज्यावेळी एकूण बाधित संख्येच्या तुलनेत 20 ते 30 टक्के असल्यास हा सामूहिक संसर्गाचा उद्रेक म्हणतात येईल. मात्र, सध्या तरी पुणे शहरात अशी परिस्थिती नाही.’ देशात करोना संक्रमण वाढले देशातील 83 जिल्ह्यांमध्ये करोनाचा सौम्य किंवा मध्य स्वरुपाचा प्रसार आहे, तेथील प्रतिबंधित क्षेत्रांत “आयसीएमआर’ने सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची ऍन्टीबॉडीज टेस्ट घेण्यात आली असून, त्यातील सव्वा टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्वेक्षण साधारण मे अखेरीस केले होते. आता देशातील संसर्गाचे प्रमाण दोन ते चार टक्क्यांनी वाढल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. करोनामध्ये ताप येणे हे सामान्य लक्षण आहे. परंतु, पावसामुळे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे दिसत नाहीत, अशा व्यक्तींनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी तपासणी करणे योग्य. मात्र, ज्यांना लक्षणे दिसतात त्यांनी त्वरीत तपासणी करून घ्यावी. – डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, साथरोग विभाग