निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

मुंबई  – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या करोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना शासनाने अत्यंत धीर आणि संयमाने केला. या लढ्यात राज्यातील डॉक्‍टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडीताईंसह अत्यावश्‍यक सेवेतील सर्व करोनायोद्‌ध्यांनी पहिल्या फळीत राहून, जोखीम पत्करुन लोकांचे जीव वाचवले. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांसह राज्यातल्या नागरिकांनी सरकारला समर्थपणे साथ दिली. त्यामुळेच राज्यातला करोना नियंत्रित राहू शकला.

राज्यावरील करोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर सर्वांनी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. करोना संकटकाळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा, अशा महत्त्वाच्या विभागांच्या निधीला कोणत्याही प्रकारची कात्री लावण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात नसली तरी ही मंडळे अस्तित्वात आहेत असे गृहीत धरुन निधीचे वाटप ठरलेल्या सूत्रानुसारच करण्यात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. करोनामुळे राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे जीएसटीच्या परताव्याची 32 हजार कोटींची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने ही थकबाकी तातडीने देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी
या आर्थिक संकटाचा सामना करत असतानासुध्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु ठेवली. त्याचबरोबर नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल. राज्यात कोणत्याही घटकावरील अन्याय, अत्याचार तसेच गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.