सीमेवर चीनच्या सैनिकांत वाढ नाही ! डेपसांग आणि डेमचोक वगळता सर्व भाग नियंत्रणात

पुणे – उत्तर सीमेवर चिनी सैन्याची तैनाती वाढत नसून ही तैनाती वर्ष 2020 मध्ये होती तशीच आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी भारतीय लष्कर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
सीमेबाबत आम्हाला आमच्या दाव्याची वैधता कायम ठेवायची आहे. सीमा विवाद सोडवणे हा एक वेगळा मुद्दा आहे. ज्या भागात आम्ही 2020 पूर्वी गस्त घालत होतो त्या भागात यथास्थिती राखली पाहिजे, ज्यावर आम्ही दावा सांगत आहोत. डेपसांग आणि डेमचोक वगळता सर्वत्र स्थिती चांगली आहे, असे प्रतिपादन चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 144 व्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना चौहान बोलत होते. यावेळी त्यांनी लष्करात दाखल व्हायला उत्सुक असलेल्या महिलांचे विशेष कौतुक केले.देशासमोरील आव्हानांवर चौहान म्हणाले की, युरोपमधील युद्ध, आपल्या उत्तरेकडील सीमेवर पीएलएची सततची तैनाती आणि आपल्या लगतच्या परिसरातील राजकीय आणि आर्थिक उलथापालथ हे सर्व भारतीय लष्करासमोर वेगळे आव्हान उभे करत आहेत.
सशस्त्र दल नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच आपण केवळ आपल्या देशातच नव्हे तर आसपासच्या परिसरात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी सक्रिय होणे गरजेचे आहे. चौहान पुढे म्हणाले की, आज आपण लष्करात एक नवीन क्रांती पाहात आहोत, जी बहुतांशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचबरोबर सशस्त्र दलदेखील मोठ्या परिवर्तनाच्या मार्गावर आहे.
मणिपूर हिंसाचार केवळ जातीय संघर्ष
जनरल अनिल चौहान यांनी मणिपूर हिंसाचारावरही भाष्य केले. ते म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचाराचा दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही. हा प्रामुख्याने दोन जातींमधील लढा आहे. ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. त्या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही राज्य सरकारला मदत करत आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणात अनेकांचे प्राण वाचवले आहेत. मात्र, मणिपूरमधील आव्हाने संपलेली नाहीत आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. दोन्ही बाजूचे लोक लवकरच शांत होतील अशी अपेक्षा आहे.





