प्रभात वृत्तसेवा वाघापूर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात आंबळे गावात डीपीची विदारक अवस्था आहे. डीपीत फ्यूज नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. या समस्येला महावितरण विभागाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.आंबळे गावातील रामवाडी येथील महावितरणचे हे रोहित्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना पिके कशीबशी जगवायची आहेत. दुसरीकडे महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर पाणी असूनही शिवार भिजवता येत नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पुरंदर तालुक्यातील आंबळे गावातील रामवाडी या ठिकाणी रोहित्रामध्ये फ्युज नाहीत. मात्र, फ्युजचे हे खोके धोकादायक आहे. याबाबत राजेवाडीचे शाखा अभियंता ठोंबरे यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते उत्तर देत नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर महावितरण कारवाई करणार का, हाही मोठा प्रश्न आहे.याबाबत सासवड येथील उप कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणले की, मी सूचना देतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.