Lok Sabha Election 2024 – महाविकास आघाडीत कोणताही मतभेद नाही, वंचितने आमच्यासोबत यावे आणि एकत्रित निवडणूक लढवावी अशीच तीनही पक्षांची भूमिका असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने जागावाटपासंदर्भात प्रस्ताव दिला आहे, त्यावर सविस्तर चर्चा झाली असून ९ मार्च रोजी जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आणि
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ९ तारखेला पुन्हा महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास १७ जागांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काही जागांवर अदलाबदली करावी, अशी भूमिका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मांडली असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या कोण किती जागा लढवणार यासंदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्च रोजी होणार आहे.
एकत्र बसून लवकरच चर्चा – आंबेडकर
मला मविआ बैठकीबाबत जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि मी एकत्र बसून लवकरच चर्चा करणार आहोत. मविआत ते आम्हाला किती जागा देऊ शकतात, कोणत्या जागा देऊ शकत नाहीत. आम्ही किती जागा मागणार यावर ही चर्चा अवलंबून आहे, असे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.