Pimpri : क्लासेसच्या शुल्कावर कोणतेही नियंत्रण नाहीच! शहरात सुळसुळाट; जाहिरातबाजी, प्रलोभने आणि शुल्कवाढ यामुळे पालकांची दमछाक

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात खासगी शिकवणी वर्गांचा सुळसुळाट झाला असून, त्याच्या अनियंत्रित शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. एकीकडे इंग्रजी व मराठी शाळांचे वाढते शुल्क आणि दुसरीकडे कोचिंग क्लासेसचे गगनाला भिडलेले दर यामुळे शैक्षणिक खर्चात मोठी भर पडत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या शाळांमध्येच मुले शिकत असूनही त्यांना परत क्लासेसकडे का वळावे लागते, हा प्रश्न पालकांना सतावतो आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत अनेक कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. या क्लासेसमधून लाखो रुपयांचे शुल्क वसूल केले जात असून, शाळांपेक्षा त्यांचे बजेट अधिक असल्याचा अनुभव पालकांना येतो आहे. यामुळेच शिक्षणाचा दर्जा कोण देतोय – शाळा की क्लासेस – यावरच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
क्लासेसमध्ये शिकवणारे शिक्षक डी.एड. किंवा बी.एड. पात्रताधारक नसतानाही विद्यार्थ्यांची गर्दी असते. या शिक्षकांनी दिलेले शिक्षण मुलांना किती परिणामकारक ठरते, याचा लेखाजोखा कुणाकडेच नाही. या क्लासेसकडून पालकांना आकर्षक आमिषेही दिली जात आहेत. वसतिगृह, ड्रेस कोड, स्पेशल बॅचेस यासारख्या सुविधांच्या नावाखाली एका विद्यार्थ्याकरिता एक ते दीड लाख रुपये वसूल केले जात आहेत. शिक्षण विभाग किंवा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षणाचा दर्जा टिकवण्याऐवजी केवळ नफा मिळवण्याच्या स्पर्धेमुळे क्लासेस हा व्यवसाय झाला आहे, अशी भावना पालकांमध्ये व्यक्त होत आहे. निकाल जाहीर होताच ‘यशस्वी विद्यार्थी आमचाच’ अशा आशयाच्या जाहिराती क्लासेसकडून करण्यात येतात. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बॅनर, पोस्टर लावून अशा क्लासेसकडून जाहिरातबाजी केली जाते. यामुळे पालक गोंधळात पडतात व आपल्या मुलासाठी अधिकचा खर्च करण्यास भाग पाडले जातात.
या वाढत्या क्लासेस संस्कृतीवर नियंत्रण आणावे, शुल्कावर मर्यादा घालावी, शिक्षण गुणवत्ता सर्वांसाठी सुलभ व्हावी, अशी पालकांची मागणी आहे. शाळांपेक्षा क्लासेस प्रभावशाली होत असतील, तर शिक्षण व्यवस्थेचाच पराभव होतोय का, हा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. संबंधित विभागांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य धोरण आखावे, अशी जोरदार मागणी आता होत आहे.
शिक्षण संस्थांची क्लासेसचे टायअप
शहरातील बहुतांश कॉलेज आणि खासगी क्लासेसचे टायअप आहे. अमुक एक कॉलेजला ॲडमिनशन घ्या. हजेरीचे मी पाहतो, असे सांगितले जाते. त्यामुळे पालकांना खासगी क्लासेस आणि कॉलेजची फी असा दुहेरी पैशांचा भूर्दंड पडतो आहे.
खासगी क्लासेसचे शुल्क गगनाला भिडल्याने सर्वसामान्य पालक आर्थिक अडचणीत आले आहेत.
शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही क्लासेसची गरज भासणे ही शिक्षणव्यवस्थेची गंभीर बाब आहे.
क्लासेस चालवणाऱ्यांपैकी अनेक शिक्षक अपात्र असूनही भरगोस शुल्क घेतले जात आहे.
ड्रेस, वसतिगृह व आकर्षक सुविधा याच्या नावाखाली लाखो रुपये वसूल केले जात आहेत.
निकालांनंतर ‘आमच्याच क्लासचा यशस्वी विद्यार्थी’ अशा जाहिरातबाजीमुळे पालक संभ्रमात पडतात.
शहरभर क्लासेसचे पोस्टर-बॅनर झळकत असून यावर कोणतेही प्रशासनिक नियंत्रण नाही.
शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे खासगी शिकवणी हा बिनधास्त व्यावसायिक उद्योग बनला आहे.
नामांकित शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात फी घेत असूनही मुलांना खासगी क्लासेस का लावावे लागतात. त्यामुळे शाळांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खासगी क्लासेसच्या शुल्कावर शासनाने अंकुश लावणे गरजेचे आहे.
– सारिका पवार, सामाजिक कार्यकर्त्या





