वानवडी, दि. 18 (प्रतिनिधी) -वानवडी परिसरातील महापालिकेच्या शिवरकर उद्यानाजवळ वानवडी-कोंढवा रोडवरील बसथांबा नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर जीव मुठीत धरून थांबावे लागत आहे. येथील बसथांबा मोडकळीस आल्याने शेड काढून टाकण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, या ठिकाणी नवीन बसथांबा उभारण्यास टाळाटाळ केली जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कॅम्प परिसरातील वेस्टएण्ड येथील बसथांबा काही महिन्यांपूर्वी अचानक कोसळून प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाला जाग आली, त्यामुळे वानवडी तसेच कोंढवा भागातील धोकादायक शेड काढण्यात आले. संविधान चौक येथील बसथांबेही काढण्यात आले आहेत. परंतु, अशा ठिकाणी नवे बसथांबे उभारण्यात आलेले नाहीत. या बाबत पीएमपीएल वाहतूक व्यवस्थापक दतात्रय झेंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.