Pimpri : दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड प्रतिभा असून त्यांना सर्वोत्तम सुविधा द्या : आयुक्त

पिंपरी : महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक नागरिकांमध्ये वेगवेगळी प्रतिभा दडलेली असते. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधावांमधील प्रतिभा ओळखा व त्यानुसार त्यांना कामांचे वाटप करा. महापालिकेमधील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांशी विभाग प्रमुखांनी चर्चा करावी, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व माहिती याविषयी सर्वसमावेशक जनजागृती निमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘महापालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ काय आहे, हे या कार्यशाळेच्या माध्यमातून सविस्तर समजावून घ्यावे. त्यानुसार महापालिकेमध्ये काम करणाऱ्या दिव्यांग बांधवांशी संवाद साधावा. त्यानुसार त्यांच्यामधील प्रतिभा ओळखावी, त्यांच्या मर्यादा ओळखा, व त्यानुसार कामांचे वाटप करा. पुढील काळात शहरातील औद्योगिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी देखील अशीच प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करा.’’
समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मानस शास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री नलावडे व माधुरी गाडेकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले. दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आभार मानले.





