मुंबई: सहसा जगात कुठेही युद्ध सुरू झाले की त्याचे चटके शेअर बाजाराला बसतात. पण वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केल्यानंतरही भारतीय शेअर बाजार (सेन्सेक्स-निफ्टी) सोमवारी ५ जानेवारी रोजी अगदी शांत होता. गुंतवणूकदारांमध्ये कोणतीही मोठी घबराट दिसली नाही. याची काही कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत जेव्हा युद्ध होते, तेव्हा सर्वात आधी कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव वाढतात. भारत बाहेरून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतो, त्यामुळे तेलाचे भाव वाढले की भारताचे बजेट कोलमडते. पण यावेळेस कच्च्या तेलाचा भाव ६१ डॉलरवरच स्थिर राहिला. जोपर्यंत हा भाव ८०-८५ डॉलरच्या वर जात नाही, तोपर्यंत भारताला मोठा धोका नाही, हे बाजाराने ओळखले आहे. वेनेझुएला ‘मोठा खेळाडू’ नाही जगाला लागणाऱ्या एकूण तेलापैकी वेनेझुएला फक्त १ टक्का तेल पुरवतो. म्हणजे तिथला पुरवठा बंद झाला तरी जगाला फारसा फरक पडणार नाही. जर हाच हल्ला सौदी अरेबिया किंवा रशियासारख्या मोठ्या देशावर झाला असता, तर मात्र बाजारात मोठी पडझड झाली असती. भारताकडे मोठी ‘शिल्लक’ आहे – भारताकडे सध्या ७०० अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. ही एक प्रकारे भारताची ‘बचत’ आहे. यामुळे जगावर कोणतेही संकट आले तरी भारत काही काळ ते सहज झेलू शकतो, असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे. भारतीय कंपन्यांचे नुकसान कमी – आपल्या देशातील खूप कमी कंपन्या वेनेझुएलामध्ये काम करतात. त्यामुळे तिथे युद्ध झाले तरी आपल्या कंपन्यांच्या नफ्यावर किंवा कामावर त्याचा काही मोठा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांचे मत काय? तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत हे युद्ध इतर मोठ्या देशांपर्यंत पसरत नाही, तोपर्यंत शेअर बाजाराला घाबरण्याचे कारण नाही. सध्या तरी हे संकट ‘मर्यादित’ स्वरूपाचे असल्याने बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली.