नांदगावच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता; छगन भुजबळांनी समीर भुजबळांना शुभेच्छा देत दिले संकेत

Sameer Bhujbal | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू आहे. यातच आता छगन भुजबळांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळांची नाशिकमधील नांदगाव मनमाड विधानसभेच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे.
नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेवून जाण्यासाठी छगन भुजबळांनी समीर भुजबळांना शुभेच्छा दिल्या. छगन भुजबळ यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!’
पुढे त्यांनी लिहिले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविला आहे. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे. समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव -मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!.’ त्यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Sameer Bhujbal |
नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील… pic.twitter.com/5X6La0vuZJ
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) October 9, 2024
दादा भुसे यांचे प्रत्युत्तर
छगन भुजबळांच्या यांच्या ट्वीटला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदगाव विधानसभेत सुहास कांदे आमदार आहेत. त्यामुळे असा दावा करणे योग्य नाही. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. मात्र नांदगावमध्ये शिवसेनेचा आमदार असल्यामुळे ती जागा आमचीच आहे. आम्ही येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित ठरेल का? असा सवालही दादा भुसे यांनी भुजबळांना केला. दरम्यान, नांदगाव मतदारसंघावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला मिळणार ? हे पहावे लागणार आहे. Sameer Bhujbal |
हेही वाचा:





