लोणी काळभोर – येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे गुरुवारी (दि. 2) रामनवमी पारंपरिक पद्धतीने मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. करोनाच्या साथीमुळे यावेळी फक्त पाच भक्त उपस्थित होते. दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात श्री समवेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांची मिरवणूक काढण्यात येते.
याप्रसंगी परिसरातील भक्त गजनृत्य सादर करतात. ढोलाच्या तालावर पडणारे लयबद्ध पदन्यास पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात. मिरवणुकीमध्ये लोणी काळभोर, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी – चिंचवड, सातारा तसेंच परप्रांतातून भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता, तसेच भाविकांना ही प्रवेश देण्यात आला नव्हता.
दरवर्षी येथे साधारण 25 हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. रस्ता दिवसभर दुचाकी, चारचाकींनी ओसंडून वाहत असतो. यंदाची रामनवमी मात्र खुपच शांततेत पार पडली.