…तर तुम्ही नाव बदलून घ्या; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा जया बच्चन यांना सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचं राज्यसभेत नाव पुकारत असताना तालिका सभापतींनी ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर जया बच्चन यांनी तालिका सभापतींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आठवडाभराने पुन्हा एकदा तशीच घटना सभागृहात घडली आहे. मात्र यावेळी जया बच्चन यांचा सामना थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी झाला. त्यानंतर धनखड यांनी जया बच्चन यांना चांगलंच सुनावलं.
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज (५ ऑगस्ट) सभागृहात जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारलं. त्यानंतर खासदार जया बच्चन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का?” त्यानंतर सभापती म्हणाले, “मी काही हे ठरवून केलं नाही. मी केवळ तुमच्या प्रतिज्ञापत्रावरील नाव वाचलं. शिवाय अमिताभ बच्चन यांना संपूर्ण देश ओळखतो, सर्वजण त्यांचा सन्मान करतात.” तरीदेखील जया बच्चन मागे हटायचं नाव घेत नव्हत्या. अखेर सभापतींनी सुनावल्यानंतर त्या शांत झाल्या.
सभापतींनी जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारल्यानंतर जया बच्चन संतापल्या आणि म्हणाल्या, “सर तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का? मला माझ्या पतीचा आणि त्यांनी केलेल्या कामांबद्दल अभिमान आहे. मला माझ्या नावाचाही अभिमान आहे. माझ्या पतीचं नाव, त्यांनी आयुष्यभरात जे काही कमावलं आहे त्यावर गर्व आहे. परंतु, तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का? आभा, जी कधी पुसली जाऊ शकत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही लोकांनी हे काय नवीनच नाटक सुरू केलंय. असं पूर्वी होत नव्हतं.”





