मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशनात सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तर अद्याप प्रलंबित असल्याने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यावरती विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा नार्वेकरांनी दिला आहे. मुनगंटीवार यांनी लक्ष्यवेधींच्या प्रलंबित मुद्द्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. काही लक्ष्यवेधी या सभागृहात मांडल्या जातात, तर काही लक्ष्यवेधींची उत्तरे ही शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, अशी प्रथा आहे. पण गेल्या काही अधिवेशनापासून ही प्रथा दिसत नसल्याचे मुनगंटीवारांनी निदर्शनास आणून दिले. यावरती बोलताना नार्वेकर म्हणाले, सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला जर असे वाटत असेल की विधीमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्याने जर दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यांच्या कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्ष्यवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल.असा इशारा त्यांनी दिला.