मुंबई : शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची कोंडी अजूनही फुटलेली नाही. अशावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी केला. हीच ती वेळ असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ईडी, इन्कमटॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण आता कोणत्याही पक्षातील आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून यांनी फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही संजय राउत यांनी केला. अशाच राजकारणामुळे राज्यातील जनतेने बंड केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ज्या जागा मिळाल्या हे त्याचेच फलित आहे. शरद पवारांच्या बाबतीत ईडीचे प्रकरण घडायला नको होते असेही ते म्हणाले. हीच ती वेळ असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. लोकसभेला युतीचा फॉर्म्युला ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले होते की विधानसभेला फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याने लढू. निवडणुकांनंतर पद आणि जबाबदा-यांचे वाटप समसमान होईल. याचाच अर्थ मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे द्यायचे असा होतो असेही संजय राउत म्हणाले.