“…तर माझी अंत्ययात्रा निघेल”; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

जालना – मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेतली आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक सभास्थळी उपस्थित राहिले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी केलेल्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले. आज पुन्हा एकदा जाहीरसभेतून जरांगे यांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “दहा दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल मराठा समाजाची नसेल. 22 ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं असेल? याची दिशा सांगितली जाईल. मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, मरेपर्यंत जाणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय तुमचा हा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही. फक्त सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचे आहे.”
पुढे ते म्हणाले, “29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्याच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघेल. हेच मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. २३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल.”
“पुढची दिशा 22 ऑक्टोबरलाच सांगितली जाईल. मराठा समाजाने सज्ज व्हावं. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता माघार नाही. हे आंदोलन शांततेत होणार पण मराठे मागे हटणार नाहीत,” असंही मनोज जरांगे म्हणाले. सरकारने दिलेल्या आश्वसनाला आता 30 दिवस पूर्ण झाले असून 10 दिवसांच्या आत मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.





