Santosh Deshmukh Case : ‘…तर ती जबाबदारी प्रशासनाची’, धनंजय देशमुखांचे फरार कृष्णा आंधळेबाबत मोठं वक्तव्य

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये तसेच राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या दरम्यान, दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक महत्वाची मागणी केली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या शोधासाठी पोलिसांकडून जंग-जंग पछाडले जात आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याने पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असे धनंजय देशमुख म्हणाले. तसेच ख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणीदेखील धनंजय देशमुख यांनी केली आहे.
तर दुसरीकडे विष्णू चाटे याचा मोबाईल देखील अद्याप सापडलेला नाही. त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंतीदेखील धनंजय देशमुख यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे सादर करणार आहेत. त्यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, सर्व काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आम्हाला न्याय देण्याच्या बाजूने आहेत. ते आमच्या बाजूने लढत असून सरकारनेही दखल घ्यावी असे धनंजय देशमुख म्हणाले.





